सावंतवाडी-दोडामार्गमधील २५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात....बेकायदा वृक्षतोडीवर टास्क फोर्सची नजर
सिंधुदुर्गनगरी
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील 25 गावांचा समावेश पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात करण्यात आला आहे. या भागात होणारी बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी संशयास्पद वृक्षतोडीची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्राच्या नियमांनुसार ही टास्क फोर्स काम करणार आहे. या समितीचे अध्यक्ष उप विभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक कॅम्पा आहेत. याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार सावंतवाडी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग आणि पोलीस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग यांचा समितीत समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळल्यास भारतीय वन अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल.वृक्षतोडीबाबत तक्रार करण्यासाठी sdtfsawantwadi@gmail.com या ई-मेलवर माहिती पाठवता येईल. तसेच वनविभाग सावंतवाडी कार्यालयाच्या 02363-272005 या क्रमांकावरही थेट संपर्क साधता येईल.पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील गावांची यादी
सावंतवाडी तालुका : असनीये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे नेवली सह, दाभिळ, ओटावणे, कानोस, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे.
दोडामार्ग तालुका : कुंभ्रल, पंतूर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.
konkansamwad 
