संकल्प प्रतिष्ठानच्या ‘वेल्वेट फ्लॉवर्स’ प्रशिक्षणाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद!
कणकवली
येथील तेली आळीतील भवानी सभागृहात २१ जून २०२६ रोजी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘वेल्वेट फ्लॉवर्स’ (मखमली फुले) प्रशिक्षण अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांसह शेजारील गोवा राज्यातील प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाला हजेरी लावत उस्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाची सुरुवात संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मुरादअली शेख यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात उद्योजकतेचे महत्त्व विशद केले. "युवा, महिला आणि शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराकडे वळवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संकल्प प्रतिष्ठान गेली १५ वर्षे सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे," असे सांगत त्यांनी प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.प्रशिक्षणाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे प्रात्यक्षिक स्वरूप होते. प्रशिक्षक श्री. सागर पेडणेकर, वृषाली कांदोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना वेल्वेट फ्लॉवर्स बनवण्याचे तंत्र आणि कौशल्ये अत्यंत सोप्या भाषेत, प्रत्यक्ष कृतीतून शिकवली. या दर्जेदार प्रशिक्षणामुळे उपस्थित प्रशिक्षणार्थींनी अत्यंत समाधान व्यक्त केले. आपल्या मनोगतात प्रशिक्षणार्थींनी संकल्प प्रतिष्ठानच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आणि प्रमाणपत्र वितरण वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले नामवंत सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, "संकल्प प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्रशिक्षणार्थींनी केवळ छंद न जोपासता, याचे रूपांतर एका यशस्वी व्यवसायात करावे आणि स्वावलंबी व्हावे." त्यानंतर सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन श्री. अमोल परब यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानचे सचिव अमोल भोगले व इतर सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
konkansamwad 
