पवारसाहेबांच्या तालमीतला मी पक्का खेळाडू, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडेन : खासदार निलेश लंके.

पवारसाहेबांच्या तालमीतला मी पक्का खेळाडू, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद पाडेन : खासदार निलेश लंके.

अहमदनगर.

   कुणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नाद करू नका. कारण त्यांचा नाद केला की ते भल्याभल्यांना घरी पाठवत असतात, असा टोला लगावून आणि 'पवार इज इक्वल टू पॉवर' असा इंग्रजीतून डायलॉग मारून अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाची सभा गाजवली. राज्यातील जनतेने राष्ट्रवादीचे ८ खासदार निवडून दिले आहेत. आम्ही सर्व जण शेतकरी प्रश्नांसाठी संसदेत आवाज उठवू, प्रसंगी संसद बंद पाडू, अशी ग्वाही निलेश लंके यांनी दिली. निलेश लंके यांनी खास ग्रामीण 'नगरी' शैलीत केलेल्या फटकेबाजीने उपस्थित नेते आणि दस्तुरखुद्द शरद पवारही खळखळून हसले.
   शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्रात आघाडीचा १५ वर्षांचा सत्ताकाळ तसेच यूपीएमधील १० वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतर पक्षासमोर भाजपच्या उदयानंतर काहीसे कठीण प्रसंग उभे ठाकले. पण त्या ही प्रसंगातून सावरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली. आज पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच लोकसभेतील पक्षाच्या दमदार कामगिरीनंतर अहमदनगर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, शेकापचे नेते जयंत पाटील, पक्षाचे सगळेच नवनिर्वाचित खासदार तसेच सर्व सेलचे अध्यक्ष आणि हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
   लोकसभेचा निकाल म्हणजे म्हणजे फक्त ट्रेलर होता. खरा सिनेमा हा विधानसभेचा असणार आहे. आजच आपण प्रचाराचा नारळ फोडू. कार्यकर्त्यांनीही प्रण करा, आगामी विधानसभेत पवारसाहेबांच्या विचारांचं सरकार आलं पाहिजे. पवारसाहेब तुम्ही नगरची काळजी करू नका. १२ पैकी १२ आमदार आपल्या विचारांचे असतील, असा विश्वास व्यक्त करत निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. कुणाचाही नाद करा पण पवारसाहेबांचा नाद कुणीही करू नये. नाद केला तर ते भल्याभल्यांना घरी पाठवतात. 'पवार इज इक्वल टू पॉवर' असा इंग्रजीतून डायलॉग मारून त्यांनी विखे बापलेकाला टोमणा मारला. लोकांना मला खासदार करायची खूपच घाई झाली होती. कधी एकदा याला दिल्लीला पाठवतो, असे त्यांना झाले होते. दिल्ली माझ्यासाठी आता नवी असेल. पण मी काम करणारा माणूस आहे. त्यामुळे काळजी करू नका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही राष्ट्रवादीचे सगळेच खासदार प्रसंगी संसदही बंद पाडू, असे निलेश लंके म्हणाले.