अणसूर-पाल हायस्कूलमध्ये 'प्रेरणा' करिअर मार्गदर्शन वर्ग उत्साहात संपन्न....अविनाश धर्माधिकारी यांचे वर्ग आयोजित करण्याचा मानस
अणसूर
"अशा प्रकारचे करिअर मार्गदर्शन वर्ग संपूर्ण जिल्ह्याभरात झाले पाहिजेत. 'चाणक्य' क्लासेसचे अविनाश धर्माधिकारी यांचे करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा माझा मानस आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना नोकरी-व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील व हा जिल्हा स्वयंपूर्ण होईल," असे प्रतिपादन अणसूर-पाल विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष श्री. गोविंद गावडे यांनी केले.अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई, माजी विद्यार्थी व अणसूर-पाल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रेरणा' करिअर मार्गदर्शन वर्ग - एक पाऊल भविष्याच्या वाटेवर या उपक्रमाचे दुसरे वर्ष शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्था सचिव श्री. लीलाधर गावडे यांच्या हस्ते झाले. "विद्यार्थ्यांनी अशा वर्गाचा लाभ घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल घडवावे व आई-वडील, शिक्षक, शाळा व गावाचा नावलौकिक वाढवावा," असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. गणेश मर्गज (प्राध्यापक, एस.पी.के. महाविद्यालय) यांनी 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता व व्यवसाय संधी' या विषयावर स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केले. जैवविविधतेचा पर्यटनातून वापर केल्यास कोकणात शाश्वत रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. भाग्यविधाता वारंग (समुपदेशक, वालावल हायस्कूल) यांनी 'करिअर गायडन्स: MPSC, UPSC, स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रातील संधी' यावर ओघवत्या भाषेत मार्गदर्शन केले.श्री. दिप्तेश मेस्त्री(संस्थापक, गुरुकुल संगीत शिक्षण संस्था) यांनी 'संगीत क्षेत्रातील विविध व्यवसाय संधी' यावर मार्गदर्शन केले. तसेच "संगीत क्षेत्र हे रायझिंग क्षेत्र असून साधना व निष्ठेने यश मिळते," असे मत व्यक्त केले. यावेळी सर्व व्याख्याते व साहित्यिक श्री. विजय सावंत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सुपारी कलम देऊन गौरव करण्यात आला. अणसूरमध्येच राहून 'गजमुख फूड्स प्रॉडक्ट'द्वारे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारे माजी विद्यार्थी श्री. गजमुख गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी अॅग्रो प्रॉडक्ट पालचे उद्योजक श्री. अंकुश गावडे यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमास सरपंच सत्यविजय गावडे, शालेय समिती सदस्य दिपक गावडे, विजय गावडे, पालचे माजी सरपंच वासुदेव बर्वे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, ज्येष्ठ शिक्षिका अक्षता पेडणेकर, माजी विद्यार्थी जगन्नाथ गावडे, किरण गावडे, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री. विजय ठाकर, प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश घाटवळ व आभार सौ. चारुता गावडे यांनी मानले.
konkansamwad 
