वेंगुर्ल्यात २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण

वेंगुर्ल्यात २७६ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण

वेंगुर्ला 

    शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने वेंगुर्ला नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम राबवली आहे. शहरातील विविध भागांतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले. कुत्र्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी करणे, संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविणे आणि रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. सदर मोहिमेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात राबविण्यात आला असून या टप्प्यात १४३ भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दि. २० ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आणखी १३३ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले. दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २७६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण झाले आहे. सदर मोहीम सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या संस्थेमार्फत राबविण्यात आली. उर्वरित भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरणासाठी येत्या काही महिन्यांत पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे. नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण, नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत.