लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत ४४ लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.

लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत ४४ लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले.

मुंबई.

  राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अवघ्या दोन आठवड्यात ४४ लाख महिलांनी अर्ज केला आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
   राज्य महिला आणि बालकल्याण सचिव अनूप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत राज्यातील ४४ लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. याशिवाय, ऑफलाइन अर्ज देखील प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी लागेल. तर, शहरी भागातील महिलांना वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी लागेल.
   राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही योजना राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै २०२४ होती. मात्र, त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.