राष्ट्रवादीचे २०-३० आमदार फुटणार?.....सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया...पहा काय म्हणाले

राष्ट्रवादीचे २०-३० आमदार फुटणार?.....सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया...पहा काय म्हणाले

 मुंबई

    
   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट झाली. तिथे राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या रोहा शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आलं आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी येण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वेगळाच बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. अजितदादा गटाचे 20 ते 30 आमदार फुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपासून संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते काहीही बोलत असतात. आमचा पक्ष एकसंघ आहे. आमचे आमदार एकत्र आहेत. कुठेही जाणार नाहीत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.संजय राऊत ज्येष्ठ पत्रकार आहेत. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. पण विधानसभा निवडणुका झाल्यापासून त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. कल्पोकल्पित कथा रचणं आणि सकाळी नरेटिव्ह सोडून देण एवढच काम राऊत यांना उरलं आहे. ते तेवढंच काम करत असतात. राष्ट्रवादी एकसंघ आहे. आमचे 41 आमदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्त्वात काम करत आहेत. कोणीही फुटणार नाही, असा दावा सुनील तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.यावेळी तटकरेंनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सुनेत्रा पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळी ज्या गोष्टी असतील त्यावेळी त्या कळतील, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे विलिनीकरणात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही, असं तटकरे म्हणाले.राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भेटीचं मला माहीत नाही. शरद पवार हे सहा दशकापासून देश आणि राज्यासाठी समर्पितपणे काम करत आहेत. राज्य आणि देशात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे रुबी रुग्णालयात असताना पंतप्रधान मोदींनी त्यांची चौकशी केली. 2015 मध्ये त्यांचा अमृत महोत्सव झाला. तेव्हा त्यांच्यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले. त्यामुळे अशा नेत्याची तब्येत ठिक नसते तेव्हा ब्रीच कँडीतून आल्यावर त्यांना भेटायला जाणं हे स्वाभाविक आहे. पवारांनीच आम्हाला घडवलं आहे. आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वात एनडीएसोबत गेलो. तो एक राजकीय विचार असू शकतो. पण शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला जाणं गैर नाही. मीही मुंबईत असल्यावर त्यांना भेटायला जाईल, असं ते म्हणाले.