टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ४ डिसेंबर रोजी डाक पेन्शन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ४ डिसेंबर रोजी डाक पेन्शन अदालत

सिंधुदुर्ग, ता. १३


 टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्यामार्फत शुक्रवार, दि. ४ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता डाक पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांचे कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनविषयक लाभांशी संबंधित तसेच सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा या अदालतीत विचार करण्यात येणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे तीन महिन्यांच्या आत निवारण झालेले नाही, अशा प्रकरणांचा विचार केला जाईल.मात्र वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढ, धोरणात्मक स्वरूपाच्या बाबी, शिस्तभंगविषयक प्रकरणे, विभागीय पदोन्नती समितीच्या (डीपीसी) निर्णयांचे पुनरावलोकन तसेच न्यायालयीन किंवा धोरणात्मक बाबींशी संबंधित प्रकरणांचा या पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही.इच्छुक निवृत्तीवेतनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिक स्वरूपात, इतरांच्या वतीने किंवा सामूहिक स्वरूपात न देता, विहित नमुन्यात तीन प्रतींमध्ये सादर करावी. तक्रार अर्ज नंदकुमार कुरळपकर, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी-४१६८१२ या पत्त्यावर दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही.तक्रार अर्जात निवृत्तीवेतनधारकाचे अथवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे नाव व सेवानिवृत्तीच्या किंवा मृत्यूच्या वेळी असलेले पदनाम, ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्या कार्यालयाचे नाव व सेवानिवृत्तीची तारीख, पीपीओ क्रमांक, ज्या पोस्ट ऑफिसमधून निवृत्तीवेतन घेतले जाते त्या पोस्ट ऑफिसचे नाव, निवृत्तीवेतनधारकाचा संपूर्ण टपाल पत्ता व दूरध्वनी क्रमांक, तक्रारीचा थोडक्यात तपशील तसेच निवृत्तीवेतनधारकाची स्वाक्षरी व दिनांक नमूद करणे आवश्यक आहे.जास्तीत जास्त पात्र निवृत्तीवेतनधारकांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.