‘रामायण’च्या भव्य पडद्यावर झळकले सावंतवाडीच्या सुपुत्राचे नाव!
सावंतवाडी
सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या ‘रामायण’ या भव्य 2D–3D चित्रपटाच्या निर्मितीत सावंतवाडी येथील B. S. Bandekar College of Fine Artचा माजी विद्यार्थी सहदेव गावकर याने Animation, VFX आणि Special Effects टीमचा महत्त्वाचा सदस्य म्हणून उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्याचे नाव या भव्य चित्रपटाच्या निर्मितीशी जोडले गेल्याने सावंतवाडी तसेच महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.भव्य चित्रपट पडद्यावर साकारताना केवळ कलाकार आणि कॅमेऱ्यामागील तंत्रज्ञच नव्हे, तर पडद्यामागे काम करणाऱ्या असंख्य कलाकार व तंत्रज्ञांची मेहनत महत्त्वाची असते. सातत्याने असणाऱ्या डेडलाईन्स, कामाचा प्रचंड ताण, प्रत्येक फ्रेम परिपूर्ण करण्याची धडपड आणि आपल्या कामाविषयीची आत्मीयता या सगळ्यातून मार्गक्रमण करत सहदेवने आपल्या कलेची आणि कौशल्याची प्रभावी छाप या चित्रपटाच्या निर्मितीत उमटवली आहे.चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात अनेक आव्हानांना सामोरे जाताना आपल्या कामाचे अंतिम रूप मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रत्येक कलाकाराच्या मनात असते. आणि अखेर चित्रपटाच्या पडद्यावर स्वतःचे नाव झळकताना मिळणारा आनंद हा त्या संपूर्ण मेहनतीची खरी पोचपावती ठरतो. सहदेवसाठीही हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक समाधानाचा ठरला आहे.सहदेवच्या या यशामुळे त्याचे आई-वडील, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच त्याचे गाव सावंतवाडी यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. त्याचबरोबर त्याने शिक्षण घेतलेल्या B. S. Bandekar College of Fine Artच्या लौकिकातही भर पडली आहे.महाविद्यालयीन शिक्षणातून मिळालेल्या कलात्मक जाणिवा, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या बळावर सहदेवने मनोरंजन विश्वातील अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याची ही यशस्वी वाटचाल महाविद्यालयातील सध्याच्या तसेच भावी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.सहदेव गावकर याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रशासन, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील कलात्मक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.“सहदेवच्या कलेला आणि मेहनतीला अशीच नवनवीन क्षितिजे मिळोत आणि त्याची यशस्वी वाटचाल उत्तरोत्तर अधिक दमदार होत राहो,” अशा शब्दांत महाविद्यालय परिवाराने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
konkansamwad 
