'रामायण' मराठीत का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्मात्यांना सवाल
मुंबई
सध्या सगळीकडे रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारेच्या रामायण चित्रपटाची चर्चा आहे. दिवाळीच्या वेळी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नितीश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट थिएटरमध्ये हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात या चित्रपटाचे कमाईचे आकडे चांगले आहेत. मात्र मराठी भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही आणि यावरूनच आता नवा मुद्दा उपस्थित झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी चित्रपटाचे निर्माते नमीत मल्होत्रा यांना पत्र लिहून हा चित्रपट मराठी भाषेत डब करून राज्यात थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करावा अशी मागणी केली आहे. रामायण हे भारतातील एक प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य आहे आणि मराठी भाषिक प्रेक्षकांनी त्यापासून का वंचित रहावं हा त्यांचा मुद्दा आहे.मराठी भाषेला 1000 वर्षांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभला आहे याकडे बाबासाहेब पाटील यांनी लक्ष वेधलं आहे. एका मोठ्या पौराणिक कथेवर आधारित प्रकल्पातून मराठी भाषेला वगळणं हे दुर्देवी आहे आणि मराठी भाषा ज्या सन्मानासाठी पात्र आहे ते नाकारण्यासारखं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेत आपल्या मातृभाषेत हा चित्रपट पाहायला मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.चित्रपटांच्या बाजारपेठेचा विचार केला तर त्यात महाराष्ट्र खूप पुढे आहे. देशातील सर्वात मोठी चित्रपटांची बाजारपेठ मुंबईत आहे आणि एका दिवसात कोट्यवधींचा गल्ला मुंबईसारख्या शहरातून मिळतो. कुठल्याही प्रादेशिक भाषेविरोधात आमची भूमिका नाहीय पण मराठी भाषिक प्रेक्षकांना सुद्धा समानतेची वागणूक आणि समान आदर मिळाला पाहिजे हे बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. रामायण चित्रपटासाठी विविध भाषांमध्ये प्रदर्शनाची रणनिती अवलंबण्यात आली आहे मग मराठी का नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि आता निर्माते यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
konkansamwad 
