कोकणचे प्रति पंढरपूर गजबजणार; श्री देवी भराडी मंदिराचा २२ वा वर्धापनदिन सोहळा १७ नोव्हेंबरला

कोकणचे प्रति पंढरपूर गजबजणार; श्री देवी भराडी मंदिराचा २२ वा वर्धापनदिन सोहळा १७ नोव्हेंबरला

मालवण 
 

   कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिराचा २२ वा सुवर्ण कलश वर्धापनदिन सोहळा मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा केला जाणार आहे. या विशेष दिनानिमित्त आंगणे कुटुंबीयांच्या वतीने मंदिरात विविध धार्मिक विधी आणि दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०० वाजता स्थानिक मुलांच्या बहारदार 'रेकॉर्ड डान्स' कार्यक्रमाने होणार आहे. मुख्य वर्धापनदिनी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता मंत्रोच्चारात 'शिवशक्तीयाग' पार पडेल. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता विधिवत सुवर्ण कलश व ध्वजपूजन, दुपारी १२.३० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद आणि दुपारी १.०० वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७.०० वाजता सुस्वर भजनांनी मंदिर परिसर दुमदुमून जाईल, तर रात्री ठीक ९.३० वाजता उदय साटम निर्मित व दिग्दर्शित आणि सौ. ज्योती उदय साटम सह-निर्मित 'मराठी पाऊल पडतं पुढे' हा भव्य मनोरंजनात्मक महाकलाविष्कार रसिकांसाठी सादर केला जाणार आहे. या उत्सवाची सांगता बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ठीक १०.०० वाजता कोकणच्या लोककलेचा अविष्कार असलेल्या दशावतार नाटकाने होणार आहे. यावेळी श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ (कसई - दोडामार्ग) प्रस्तुत 'देवाचा डोंगर' हा पौराणिक रहस्याने युक्त नाट्यप्रयोग रंगणार आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन आंगणे कुटुंबीय (आंगणेवाडी) आणि आंगणेवाडी विकास मंडळ (मुंबई) यांच्या वतीने करण्यात आले आहे.