शेवटच्या चेंडूवर भारताचा थरारक विजय!......पाकिस्तानला हरवून U-19 आशिया कप भारताचाच!
ओमान
क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा वाघांनी पाकिस्तानला १ विकेटने हरवून U-19 आशिया कप जिंकला आहे. ३३८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार मारून ९वे विजेतेपद पटकावले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ५० षटकांत ३३७/९ धावा केल्या. उस्मान खानने शानदार १०७ धावा केल्या, तर अब्दुल कादिरने ८० आणि कर्णधार फरहान युसूफने ६३ धावांची खेळी केली.एका क्षणी पाकिस्तान ३० षटकांत २०४/२ असा मजबूत स्थितीत होता, पण भारताच्या गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत फक्त ६३ धावांत ६ विकेट घेत सामन्यात पुनरागमन केले. काव्या पटेलने ४/६८ आणि चिगुरुपती वेंकटाने ३/४० बळी घेतले.३३८ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था ४२व्या षटकात २५२/८ अशी झाली होती. सामना हातातून गेलाय असं वाटत असतानाच मानल चौहान आणि मोहित उल्वा यांनी इतिहास घडवला.कर्णधार लक्ष्य रायचंदानीने ८० आणि आर्यवीर सेहवागने ५८ धावा करून पाया रचला होता. पण खरी कमाल केली ती शेवटच्या जोडीने. मानलने ४७ चेंडूत ४७ धावा केल्या, तर मोहित उल्वाने २६ चेंडूत नाबाद ४९ धावांची वादळी खेळी केली.शेवटच्या १२ चेंडूत भारताला २५ धावा हव्या होत्या. मोहितने ४९ व्या षटकात १७ धावा कुटून समीकरण सोपं केलं. शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या असताना मोहितने वाइड लाँग-ऑफकडे चौकार मारून संपूर्ण भारताला जल्लोष करायला लावलं. भारताने ३३९/९ धावा करत विजय मिळवला.विशेष म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये याच पाकिस्तानने भारताला हरवलं होतं. पण फायनलमध्ये भारताने बदला घेतला आणि गतविजेत्या पाकिस्तानकडून ट्रॉफी हिसकावून घेतली.चक दे इंडिया! युवा भारताचा हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.
konkansamwad 
