गणेशोत्सवानिमित्त ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान......स्वच्छतेसाठी नागरिक, गणेशोत्सव मंडळे व पर्यटकांनी सहकार्य करावे.....जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन

गणेशोत्सवानिमित्त ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान......स्वच्छतेसाठी नागरिक, गणेशोत्सव मंडळे व पर्यटकांनी सहकार्य करावे.....जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 

       गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची संख्याही वाढत आहे. या कालावधीत गावागावांत तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार असल्याने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हीच सेवा २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात गावागावात दि. ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.गणेशोत्सवाच्या काळात गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे तसेच ‘कचरामुक्त सिंधुदुर्ग’ या संकल्पनेला अधिक बळकटी देणे गरजेचे आहे. परिसर स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख बाजारपेठा, पर्यटन स्थळे तसेच गणेशोत्सवाच्या ठिकाणांचा परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील रस्ते, सार्वजनिक परिसर आणि इतर ठिकाणी स्वच्छता राखून नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविक व पर्यटक जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त सिंधुदुर्ग ही जिल्ह्याची ओळख कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. गणेशोत्सवाच्या काळात कचरा उघड्यावर न टाकता त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे तसेच परिसर स्वच्छ ठेवणे, यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.गणेशोत्सव हा सिंधुदुर्गाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हा उत्सव केवळ धार्मिक स्वरूपाचा न राहता सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देणारा ठरावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.स्वच्छता उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. प्रत्येकाने आपले घर, परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि गणेशोत्सव मंडप परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग घडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांनी केले आहे.