प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा केवळ एक रुपयात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा केवळ एक रुपयात.  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

   खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी  होण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. एक रुपयात पीक विमा हप्ता भरुन जास्तीत जास्त  शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
    नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता येणाऱ्या प्रधानमंत्री पीक योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्या पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे.
   खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. शेतकरी हिस्स्याची विमा हप्त्या रक्कम रु. 1 वजा जाता राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
   सिंधुदुर्ग जिल्यातील भात पिकाकरीता अधिसूचित असलेल्या 57 महसूल मंडळांमध्ये, नाचणी पिकाकरीता अधिसूचित 52 महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.