मुख्यमंत्री निधी आणि पत्नीच्या त्यागाने मिळाले नवजीवन!.....अकोल्याच्या प्रशांत यांची थक्क करणारी गोष्ट
मुंबई
आर्थिक अडचणीमुळे जीवघेण्या आजारावर उपचार अशक्य वाटत असतानाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पत्नीच्या त्यागामुळे एका कुटुंबाला पुन्हा नवे आयुष्य मिळाले आहे. अकोल्याचे प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले असून, यासाठी तब्बल 21 लाख 60 हजार रुपयांची मदत उभारण्यात आली.47 वर्षीय प्रशांत इंगळे हे अकोल्यात केबल टाकण्याचे काम करून कुटुंब चालवतात. घरात वृद्ध आई-वडील, पत्नी वर्षा, महाविद्यालयीन मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पोटदुखीने सुरू झालेल्या त्रासानंतर तपासणीत त्यांचे यकृत निकामी होत असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण सांगितले. मात्र 25 ते 30 लाखांचा खर्च ऐकून कुटुंब हादरले.निराश झालेल्या कुटुंबाला अकोल्याच्या आमदारांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती दिली. त्यानंतर इंगळे कुटुंबीयांनी मुंबईत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. नाईक यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री निधीतून 2 लाख रुपये आणि टाटा ट्रस्टकडून 19 लाख 60 हजार रुपये अशी एकूण 21 लाख 60 हजार रुपयांची मदत मिळवून दिली.या मदतीमुळेच 25 जून 2026 रोजी नानावटी रुग्णालयात प्रत्यारोपण शक्य झाले. यात प्रशांत यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारल्याने 13 जुलैला त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.इंगळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामेश्वर नाईक आणि टाटा ट्रस्टचे आभार मानले.याबाबत रामेश्वर नाईक म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने हा निधी कार्यरत आहे. प्रशांत यांना वेळेत मदत देता आल्याचा आम्हाला आनंद आहे."
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
konkansamwad 
