कणकवलीत महसूल समाधान शिबिर..... लँड टायटलिंग व गुंठेवारीबाबत महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा

कणकवलीत महसूल समाधान शिबिर..... लँड टायटलिंग व गुंठेवारीबाबत महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा

 

कणकवली


     छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत कणकवली तहसीलदार कार्यालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभवाटप व नागरिकांच्या निवेदन स्वीकृतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध शासकीय योजनांतील पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. तसेच नागरिकांच्या विविध मागण्या, अडचणी व समस्यांबाबत निवेदने स्वीकारून संबंधित विभागांना त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमात बोलताना मंत्री बावनकुळे यांनी राज्यात लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर बांधण्यात आलेली घरे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यासंदर्भातील महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आवश्यक महसुली प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाचे प्रभावी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सक्षम करून लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान सेवा देण्याच्या दृष्टीने महसूल समाधान शिबिर अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.