महावितरणची धडक मोहीम.....४ महिन्यात १९५९९ ठिकाणी वीजचोरी उघड.....३० कोटी ३६ लाखांचा दणका

महावितरणची धडक मोहीम.....४ महिन्यात १९५९९ ठिकाणी वीजचोरी उघड.....३० कोटी ३६ लाखांचा दणका

मुंबई  दि.१८

 

      महावितरणने राज्यभरात वीजचोरीविरुद्ध सुरू केलेल्या धडक मोहिमेत गेल्या चार महिन्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील 19 हजार 599 ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये केवळ जुलै महिन्यातच 11 हजार 32 वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत.थेट तारेच्या हूकद्वारे आणि मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणाऱ्या 15 हजार 965 प्रकरणांमध्ये 30 कोटी 36 लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले आहे. त्यातील 6629 ग्राहकांनी आतापर्यंत 14 कोटी 12 लाख रुपयांचा भरणा केला आहे. उर्वरित 3 हजार 634 प्रकरणांचे मूल्यांकन सुरू आहे. तसेच 4959 प्रकरणांमध्ये 1 कोटी 85 लाख रुपयांचे तडजोड शुल्क देखील आकारण्यात आले आहे.एप्रिलपासून सुरू असलेल्या या मोहिमेत सर्वाधिक वीजचोरी कोकण प्रादेशिक विभागात उघड झाली आहे. कोकण - 7496, नागपूर - 4521, छत्रपती संभाजीनगर - 4597 आणि पुणे - 2985 अशा एकूण 19,599 वीजचोऱ्या आढळल्या आहेत.1 जुलैपासून मोहीम आणखी तीव्र करण्यात आली. या एका महिन्यातच 11 हजार 32 ठिकाणी वीजचोरीचा पर्दाफाश झाला. त्यातील 8462 प्रकरणांचे मूल्यांकन करून 15 कोटी 11 लाख रुपयांचे वीजबिल संबंधितांना देण्यात आले. त्यापैकी 3036 प्रकरणांमध्ये 6 कोटी 22 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. जुलैमध्ये छत्रपती संभाजीनगर - 2365, कोकण - 4084, नागपूर - 2324 आणि पुणे - 2259 वीजचोऱ्या आढळल्या. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, वीजचोरीच्या संपूर्ण रकमेचा दंडासह मुदतीत भरणा न केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 नुसार फौजदारी कारवाई केली जाईल. या कायद्यानुसार वीजचोरीसाठी दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांचीही तपासणी सुरू आहे. अशा ग्राहकांनी अन्य ठिकाणाहून वीज वापर केल्यास त्यांच्यावरही वीजचोरीची कारवाई करण्यात येत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.