चिपळूण मध्ये ५ मे रोजी कुंभार्लीचा राजा या भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन.

चिपळूण मध्ये ५ मे रोजी कुंभार्लीचा राजा या भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन.

रत्नागिरी.

   चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी "कुंभार्लीचा राजा" ही भव्य सायकल स्पर्धा दिनांक ५ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. गेली दोन वर्ष अत्यंत उत्कंठावर्धक होत असलेल्या या स्पर्धेत यावर्षी तब्बल ३०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले खेळाडू तसेच दोन परदेशी सायकलस्वार देखील कुंभार्ली घाट सर करण्यासाठी चिपळूण मध्ये लवकरच दाखल होतील. ही स्पर्धा पाच गटात होणार आहे. पहिले तीन गट हे पुरुषांचे असून १६ ते ३५ वयोगट, ३५ ते ५० वयोगट आणि ५१ पेक्षा अधिक वयोमर्यादा असलेले पुरुष अश्या श्रेणीत विभागले आहेत. महिलांसाठी वेगळा गट करण्यात आलेला आहे. मुलांची सायकलिंगची वाढती आवड लक्षात घेता यावर्षी मुलांना देखील स्पर्धेत सहभागी करून घेत त्यांचा वेगळा गट तयार करण्यात आला आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता बक्षिसांची संख्या देखील वाढवण्यात आलेली आहे. रविवार ५ मे रोजी सकाळी साडे पाच वाजता बहादुर शेख नाका इथून या स्पर्धेला सुरवात होऊन कुंभार्ली घाटमाथा येथे समाप्त होईल. २९ किमी अंतराच्या या स्पर्धेत सुमारे १२ किमीचा घाट हा स्पर्धेची चुरस वाढवतो. या स्पर्धेसाठी सर्व गटांसाठी चषक, रोख बक्षिसे अशी दीड लाखाहून जास्त किंमतीची पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. चिपळूण मधील अनेक दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी अर्थसहाय्य केले आहे. देशविदेशातून येणाऱ्या खेळाडूंचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी ५ मे रोजी सकाळी ठीक साडे पाच वाजता बहादुर शेख नाका येथे उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे. स्पर्धेनंतर बांदल हायस्कूल सभागृह येथे विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. तरी नागरिकांनी दोन्ही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे करण्यात आले आहे.