१४३ वर्षांचा इतिहास जमीनदोस्त! सावंतवाडीच्या ऐतिहासिक जेलची तटबंदी पाडली
सावंतवाडी
सावंतवाडी येथील संस्थानकालीन आणि १४३ वर्षे जुना ऐतिहासिक वारसा असलेली जिल्हा कारागृह वर्ग-२ ची संरक्षक भिंत अखेर पाडण्यात आली आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण इतिहासजमा झाले आहे. या ठिकाणी आता ४ कोटी रुपये खर्च करून आरसीसी स्वरूपाची नवीन मजबूत संरक्षक भिंत उभारण्यात येणार असून, ती ३२८ मीटर लांब आणि ८.३ मीटर उंच असणार आहे.सन १८८२ मध्ये ब्रिटीश काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या कारागृहाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, दोन ते अडीच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या जुन्या दगडी भिंतीवरच अडीच फुटांचे वाढीव चिऱ्यांचे बांधकाम केले होते. या अयोग्य बांधकामामुळे भिंतीवर अतिरिक्त भार येऊन ती धोकादायक बनली होती. अखेर गेल्या वर्षी या भिंतीचा दर्शनी भाग कोसळला. या घटनेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या अहवालात ही भिंत जीर्ण व धोकादायक घोषित करून नवीन भिंत उभारण्याचा निर्णय घेतला.आमदार दीपक केसरकर यांनी या ठिकाणी 'जेल टूरिझम' विकसित करण्याची संकल्पना मांडली होती. मात्र, आता ही मूळ ऐतिहासिक वास्तूच पाडल्यामुळे या टूरिझम संकल्पनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर बांधकाम अधिकाऱ्यांनी आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले. सावंतवाडीतील ऐतिहासिक ठेवे एकापाठोपाठ एक नष्ट होत चालल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, प्रशासनाने उर्वरित इतिहासाचे साक्षीदार जपण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
konkansamwad 
