बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन; मोहम्मद युनूस यांनी सरकारचे प्रमुख म्हणून घेतली शपथ.

ढाका.
बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र, आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून आज गुरूवारी शपथ घेतली आहे. मोहम्मद युनूस यांच्यासह एकूण १५ सदस्यांनी शपथ घेतली आहे.
अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं असून या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस असणार आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर देशात शांतता प्रस्थापित करण्याचं मोठं आव्हान मोहम्मद युनूस यांच्यासमोर अर्थात या अंतरिम सरकार समोर असणार आहे. दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलकांकडून करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानंतर मोहम्मद युनूस हे परदेशातून बांगलादेशमध्ये परतले होते. यानंतर आज त्यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली आहे.
बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरीम सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीही देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्यांवरील आव्हानांचा सामना मोहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्यासाठी हे सरकार चालवणे आव्हानात्मक असणार आहे. शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर आज बांगलादेशमध्ये नवीन अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस आणि इतर सदस्यांना बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बांगलादेशात १७ वर्षांनंतर अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशवर लागोपाठ १५ वर्षे राज्य केले. पण हिंसक आंदोलनानंतर अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून जावे लागले.