सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लवकरच ३२ शिपाई पदांची भरती  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लवकरच ३२ शिपाई पदांची भरती  

 

सिंधुदुर्गनगरी

 

     जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या ३२ शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, इच्छुक उमेदवारांना २० ते ३० ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी, ६ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गात घेतली जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या या पदांच्या भरतीसाठी बँकेने सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. सहकार खात्याने मान्यता दिल्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ती राबवण्याची जबाबदारी 'कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन'कडे सोपवण्यात आली आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असून, वयोमर्यादा २१ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळणार असल्याने अर्ज भरताना अधिवास प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. भरतीची सविस्तर माहिती आणि जाहिरात www.kopbankasso.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लेखी परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठवले जाईल. परीक्षेस येताना हॉल तिकीट आणि मूळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेनंतर गुणवत्तेनुसार उमेदवारांची तोंडी मुलाखत घेतली जाईल. अर्ज करताना काही अडचण आल्यास उमेदवारांसाठी ७४९८८५०४२९ हा हेल्पलाइन क्रमांक आणि help@kopbankasso.co.in हा ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे.