सावंतवाडीत 'राजमाता जिजाऊ' बसेसचे थाटात स्वागत....आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडीत 'राजमाता जिजाऊ' बसेसचे थाटात स्वागत....आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण

 

सावंतवाडी 

 

   महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 'राजमाता जिजाऊ' श्रेणीतील ५ नवीन अत्याधुनिक एसटी बसेसचे आज सावंतवाडी बसस्थानकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन व श्रीफळ फोडून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख खेमराज कुडतरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार केसरकर यांनी त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसफेरीचा शुभारंभ केला.लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि शहरप्रमुख खेमराज कुडतरकर यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह नवीन बसमधून मोती तलाव परिसरात फेरफटका मारला.याप्रसंगी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, "परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण झाले आहे. सावंतवाडी मतदारसंघासाठी एकूण २० गाड्या मंजूर झाल्या असून त्यापैकी १० गाड्या सावंतवाडी, ५ वेंगुर्ला आणि ५ दोडामार्गसाठी देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील ५ गाड्या आज दाखल झाल्या असून गणेशोत्सवात प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल." तसेच सावंतवाडी बसस्थानक परिसरातील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.