गणेशोत्सवासाठी वेंगुर्लेतील पार्किंग ते वाहतुकीचे नियोजन जाहीर

गणेशोत्सवासाठी वेंगुर्लेतील पार्किंग ते वाहतुकीचे नियोजन जाहीर

वेंगुर्ला 

 

        गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेची नियोजन बैठक नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह पोलीस, तहसील, महावितरण, आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, व्यापारी व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत गणेशोत्सव काळातील पार्किंग, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

पार्किंग व्यवस्था अशी 
फोर व्हीलर:गणेश कॉम्प्लेक्स, माणिकचौक, शाळा नं. 1, सिध्दीविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय परिसर
थ्री व्हीलर: वेंगुर्लेकरवाडी, रामेश्वर मंदिर
टू व्हीलर:सागररत्न मत्स्य बाजारपेठ, पवनपुत्र भाजी मंडई, टिळक वाणिज्य संकुल तळमजला, मराठी शाळा नं.1 पटांगण

      पार्किंग ठिकाणी मोठे फलक लावणे आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय झाला. दि. 10 ते 26 सप्टेंबर दरम्यान एसटी थांबा रामेश्वर मंदिराजवळ असेल, तर अवजड वाहने हॉस्पिटल नाका-कॅम्प-नाथ पै रोड मार्गे वळवली जातील. माटीचे साहित्य विक्रीसाठी दि. 12 व 13 सप्टेंबर रोजी बॅ. खर्डेकर रोडवर वाहतूक बंद राहील.तसेच महावितरणने उत्सव काळात लोडशेडिंग न करण्याचे, सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवून धोकादायक झाडे हटवण्याचे आणि आरोग्य विभागाने एसटी स्टँड येथे वैद्यकीय पथक तैनात करण्याचे ठरले.

सर्वात महत्त्वाचा निर्णय - वेंगुर्ला बॅनरमुक्त

      या बैठकीत सर्वपक्षीय एकमताने 'बॅनरमुक्त वेंगुर्ला' चा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यापुढे शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला, चौकात किंवा विद्युत व दूरध्वनी खांबांवर कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक अथवा वैयक्तिक कार्यक्रमाचे अनधिकृत बॅनर, फ्लेक्स लावण्यास पूर्ण बंदी असेल. परवानगीशिवाय बॅनर लावल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. शुभेच्छा देण्यासाठी नगरपरिषदेने निश्चित केलेल्या ठिकाणी सशुल्क एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.प्लास्टिक व थर्माकोल वापरावरही बंदी असून पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.