मळगाव ब्रिजवर दुधाच्या टँकरला आग

मळगाव ब्रिजवर दुधाच्या टँकरला आग

 

सावंतवाडी
 

        गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या दुधाच्या टँकरच्या मागील चाकांच्या एक्सलमध्ये घर्षण होऊन आग लागल्याचा प्रकार मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव ब्रिजवर घडला. याचवेळी बायपास वरून पलीकडच्या बाजूने जात असलेल्या पोलिसांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी त्वरीत सावंतवाडी नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. बंबाच्या सहाय्याने ही आग त्वरित विझवल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांच्या तत्परतेमुळे ही दुर्घटना टळली त्यामुळे टँकर चालकाने पोलिसांचे आभार मानले.झाराप पत्रादेवी बायपासवरून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या पोलीस व्हॅन मधील पोलिसांना महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या टँकरच्या मागील चाकाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत त्वरित सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाला माहिती दिली. यावेळी हेडकॉन्स्टेबल अमित राऊळ यांनी त्वरित सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला याबाबतची माहिती देत घटनास्थळी रवाना केले.पोलीस हेडकॉन्स्टेबल अमित राऊळ यांच्यासह हेडकॉन्स्टेबल संतोष गलोले, कॉन्स्टेबल पवन परब, कॉन्स्टेबल महेश निरवडेकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. बंबाच्या सहाय्याने त्वरित टँकरच्या मागील चाकाच्या एक्सेल मध्ये लागलेली आग बुजवण्यात आली. त्यानंतर सदरचा टँकर सुरक्षितस्थळी हलविण्यात आला.