केंद्रीय कृषीमंत्री दर मंगळवारी शेतकऱ्यांशी संवाद साधणार.

केंद्रीय कृषीमंत्री दर मंगळवारी शेतकऱ्यांशी संवाद साधणार.

नवीदिल्ली.

  मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळात शेतकऱ्यांशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आता दर मंगळवारी शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्राची माहिती देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी चौपाल कार्यक्रमही सुरू करणार आहे.
   सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल कृषी मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची माहिती कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. दर मंगळवारी शेतकऱ्यांशी थेट संवाद होणार आहे. त्यासाठी दर मंगळवारी दुपारची वेळ या चर्चेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील. यासोबतच शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती लवकरात लवकर मिळावी यासाठी ऑक्टोबरपासून किसान चौपाल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दर महिन्याला वैज्ञानिक शेतकऱ्यांना आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.
    तीन कृषी कायद्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना कृषीमंत्री चौहान म्हणाले की, समितीच्या आतापर्यंत २३ बैठका झाल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने रब्बी हंगामासाठी २४ हजार ४७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत, असेही  कृषीमंत्री म्हणाले.रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर सुधारित बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे पुरवण्यासाठी कृषी आणि शैक्षणिक संस्थाही काम करणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून कमी पाणी लागणाऱ्या पिकांचे नवीन वाण विकसित केले असल्याचेही ते म्हणाले.