दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा.
नवीदिल्ली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची प्रचंड चर्चा रंगली होती. अशावेळी अतिशी मार्लेना यांचं नाव आज मंगळवारी मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दोन नावांवर चर्चा सुरू होती, त्यामध्ये अतिशी यांच्या व्यतिरिक्त कैलाश गेहलोत यांचे नाव आघाडीवर होते, मात्र बैठकीत अतिशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे आतिशी यांनी जर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होतील. याआधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आतिशी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. तर केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्याच दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. तर आज केजरीवाल आपला राजीनामा देणार असून लवकरच आतिशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे बोलले जात आहे. यादरम्यान आप नेते सौरभ भारद्वाज यांनी, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनण्यात पक्षाला रस नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरच अतिशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर आता नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसेल.
आतिशी यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी दिल्ली येथे झाला असून त्यांचे वडील नामविजय सिंह दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.आतिशीने यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल, नवी दिल्ली येथून झाले आहे. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. याच विद्यापीठातून त्यांनी शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर अशी पदवी घेतली. त्यानंतर त्यांचा आपच्या नेत्यांशी संपर्क आला आणि त्या आपमध्ये सामिल झाल्या. यानंतर २०२० मध्ये आतिशी यांनी पहिल्यांदा कालकाजी मतदारसंघात विधानसभा लढवली. ज्यात त्यांनी भाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला.