बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला; दंगेखोरांनी हॉटेलला लावली आग; ८ जण जीवंत जळाले.

बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला; दंगेखोरांनी हॉटेलला लावली आग; ८ जण जीवंत जळाले.

ढाका.

बांगलादेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे. त्यानंतर देखील तेथील परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाहीये. उलट बांगलादेशमध्ये मोठी अराजकता माजली आहे. हिंसाचारात वाढ झालेली असून, बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू, शेख हसीना आणि त्यांचा पक्ष अवामी लीगचे समर्थक आणि त्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या घरावर, पक्षाच्या कार्यालयावर हल्ले होत आहे. जेसोर येथे एका हॉटेलला दंगेखोरांनी आग लावली. त्यामध्ये ८ लोक जीवंत जळाले तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले.
   दंगेखोरांनी पेटवलेले हॉटेल हे अवामी लीगचे नेते शाहीन चकलादार यांचे असून चकलादार जेसोर जिल्ह्याचे अवामी लीगचे महासचिव आहे. मृतांमधील दोघांची ओळख पटली आहे. २० वर्षीय चयन आणि १९ वर्षीय सेजन हुसेन यांचा हॉटेलला लावण्यात आलेल्या आगीत मृत्यू झाला. आगीत ८४ जण जखमी झाले असून त्यातील बहुतांश जण विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर जेसोर येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. बांगलादेशच्या शेरपूरमध्ये असलेल्या तुरुंगावर चाल करत दंगेखोरांनी ५०० कैद्यांना तुरुंगातून पळवले. एकीकडे देशभरात संचारबंदी लागू असताना जमाव लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरला आहे. जमावानं दमदमा-कालीगंजमधील जिल्हा कारागृहावर हल्ला चढवला. आंदोलकांनी तुरुंगाचा गेट तोडून आग लावली.
   अवामी लीगचे खासदार काजी नबील यांच्या निवासस्थानाची तोडफोड करत घराला आग लावण्यात आली. बांगलादेशचा क्रिकेटपटू लिटन दास आणि माजी कर्णधार मुशरफी मुर्तजा यांची घरे देखील पेटवण्यात आली. लिटन दास हा अल्पसंख्याक हिंदू समाजातील आहे, तर मुर्तजा अवामी लीगचा नेता आहे. जानेवारी झालेली सार्वत्रिक निवडणूक लढवून मुर्तझा खासदार झाले. तर लिटन दास बांग्लादेश क्रिकेट संघात यष्टीरक्षक आणि सलामीवीर आहे. बांगलादेशाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठ्या हिंसक घटनांपैकी एक मानण्यात येत आहे. यापूर्वी १९ जुलै रोजी ६७ लोक मारले गेले होते. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यासाठी हिंसक आंदोलन केले. बांगलादेशात आरक्षण विरोधात विद्यार्थी २०१८ पासून आंदोलन करत आहे. पण यावेळी मोठी हिंसा झाली. हिसेंचे लोण संपूर्ण देशभरात पोहचले. या आंदोलनापुढे शेख हसीना सरकारला झुकावे लागले.