राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी.

राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरी आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी.

मुंबई.

  मुंबईत कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे. आज राज्यातील रत्नागिरी आणि गडचिरोली या २ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यभरात विविध भागात सध्या जोरदार पाऊस बरसणार आहे. या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
    हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा रेड अलर्टमध्ये समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची, ते अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. पावसाची शक्यता पाहता या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, तसेच स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
    यासोबत महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना सध्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
   रेड आणि ऑरेंज अलर्टसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर या भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये पावसाच्या मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानंतर, आता नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. मुंबईतही पावसाचा जोर सध्या वाढताना दिसत असल्याने मुंबईकरांचे काहीसे हाल होतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर, महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही आता पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.