परुळे येथे राधारंग फाउंडेशनच्या शारदा फिटनेस सेंटरचे उद्घाटन..
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राधारंग फाउंडेशनच्या वतीने परुळे येथे शारदा फिटनेस सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागात व्यायामशाळांचे प्रमाण कमी असून, असलेल्या व्यायामशाळांमध्ये प्रामुख्याने पुरुष व्यायाम करतात. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असावी, या उद्देशाने हे फिटनेस सेंटर सुरू करण्यात आले आहे. राधारंग फाउंडेशनचे संस्थापक सदस्य रघुनाथ सरनाईक आणि अशोक सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. या फाउंडेशनकडून महिलांसाठी योग प्रशिक्षण वर्गही घेतले जातात. महिलांमध्ये आरोग्य आणि व्यायामाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या हे सेंटर अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे येथे सुरू करण्यात आले आहे. राधारंग फाउंडेशनच्या सांस्कृतिक भवनाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, ते पूर्ण झाल्यानंतर हे सेंटर तेथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात प्राथमिक स्वरूपाची व्यायाम उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून, गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, अरुणा सामंत, पूर्वा नाईक, सानवी देसाई, वैशाली भांगरे, रूपा ठाकूर, तेजश्री सावंत, मयुरी परब आदी उपस्थित होत्या. स्वतःला तंदुरुस्त ठेवून आरोग्यसंपन्न राहण्यासाठी महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राधारंग फाउंडेशनकडून करण्यात आले आहे.
konkansamwad 
