प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी साठी सिंधुरत्न समृद्ध योजना.

सिंधुदुर्ग.
जिल्ह्यात एकूण फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः १,४२,९४७ हेक्टर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फळ पिकाखालील क्षेत्र असूनही फळांची काढणी करताना साधारणतः १५ ते २० टक्के उत्पन्न हाताळणी करताना शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीत्तोर नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२३-२४ अंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी करीता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.
या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.२० हे. क्षेत्र फळपिकाखालील असावे, एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल, अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
जिल्हा परिषद कृषी विभाग सिंधुदुर्ग यांची जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर रु. ४८०/- प्रति प्लास्टिक क्रेट्स आणि रु. २०००/- प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदान प्रमाणे सदर प्लास्टिक क्रेट्स साठी जास्तीत जास्त रु. ३६० प्रति क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री साठी जास्तीत जास्त रु. १५०० प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. तसेच एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त १५ क्रेट्स व १ ताडपत्री याप्रमाणे कमीत कमी एका शेतकऱ्याने १० क्रेट्स व १ ताडपत्री खरेदी करणे बंधनकारक राहील. सदर प्लास्टिक ताडपत्रीचे आकारमान ६ मी x ४ मी इतके असावे. सर्व साहित्य BIS/ISI प्रमाणित असणे बंधनकारक असेल.
तरी या योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दि.१९ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.