सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध....जिल्हा पुरवठा विभागाची माहिती
सिंधुदुर्गनगरी
आखाती देशातील तसेच अमेरिका, इस्रायल व इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरत आहेत. मात्र जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कंपन्यांमार्फत दररोज एजन्सीमध्ये सिलेंडरची आवक होत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. गॅस सिलेंडरचे बुकिंग करताना आता ओटीपी बुकिंगऐवजी आयओसीएल, बीपीसीएल किंवा एचपीसीएल या कंपन्यांनी दिलेल्या नवीन अॅपद्वारेच बुकिंग करावे. बुकिंग केल्यानंतर तात्काळ सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांनी ठेवू नये. कंपनीने बदललेल्या प्रक्रियेनुसार आता शहरी भागात २५ दिवस व ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतराने गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाणार आहे, याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात काही अडचणी उद्भवल्यास प्रशासनाच्या ०२३६२-२२८८४७ किंवा १०७७ या हेल्पलाइन क्रमांकावर अथवा ७४९८०६७८३५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच संबंधित तालुक्यातील पुरवठा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

konkansamwad 
