प्रा.सुषमा प्रवीण मांजरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर.
सिंधुदुर्ग.
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर ) यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे सौ. मांजरेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यभरातील 108 शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सौ. मांजरेकर यांची माध्यमिक विभागातून निवड करण्यात आली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण समितीवरही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत.
सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) या गेली 21 वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. मराठी, हिंदी, अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एमए पदवी संपादन केली आहे. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी झाले.
या निवडीबद्दल सौ. मांजरेकर यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत, सचिव शांताराम गावडे, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. प्रा. सौ. मांजरेकर या सातोसे रहिवासी तर तळवडे येथील ट्रक व्यवसायिक नाना गोडकर यांच्या सुकन्या आहेत.