वेंगुर्लेत गुणवंत विद्यार्थ्यांचा भंडारी समाजाकडून सन्मान
वेंगुर्ला
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित "भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ - २०२६" साई दरबार हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात भंडारी समाजातील शिक्षण, कला, उद्योग, समाजसेवा, संशोधन, विधी, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती आणि दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर होते. उद्घाटन महादेव भाऊ बाबू आंदुर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती शंकर घारे, पंचायत समिती सदस्या शीतल राऊत व साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, नगरसेविका लीना म्हापणकर यांच्यासह गजानन गोलतकर, डॉ. गोविंद धुरी, सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, रमेश नार्वेकर, विकास वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.समाजातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महादेव आंदुर्लेकर, रमेश नार्वेकर, डॉ. सचिन परुळकर, डॉ. गोविंद धुरी, शैलजा परुळकर, प्रा. शिवानी रोकडे, अॅड. उत्कर्षा गोडकर, अॅड. नेहा बांदेकर, सी.ए. जान्हवी अणसूरकर यांच्यासह १४ मान्यवरांना मानपत्र, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या पंचायत समिती सभापती शंकर घारे, सदस्या शीतल राऊत, साक्षी नार्वेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर व नगरसेविका लीना म्हापणकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद बांदेकर म्हणाले, समाजाच्या प्रगतीचा पाया शिक्षणात आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता ज्ञान, संस्कार व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे. समाजाने गुणवंत विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.उद्घाटक महादेव आंदुर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी व विविध स्पर्धा परीक्षा करिअरची सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य नियोजन व आत्मविश्वासाने प्रशासकीय सेवेत यश मिळवता येते, असे आवाहन त्यांनी केले.पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी शिक्षण हेच यशाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांनी संधींचा लाभ घ्यावा. अशा सन्मान सोहळ्यांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.खजिनदार सुरेश बोवलेकर यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी देणारे बनण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला समाजबांधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सचिन परुळकर यांनी केले तर आभार सचिव डॉ. गोविंद धुरी यांनी मानले.
konkansamwad 
