कोकण विकास संस्थेचा कोकण रत्न पुरस्कार मनीष दळवी यांना जाहीर
सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणाऱ्या तसेच जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येकाला जिल्हा बँकेशी जोडून त्यांना सहकाराच्या परीघात आणणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार क्षेत्रासाठीचा 'कोकण रत्न २०२४' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कला क्षेत्रातील कोकण रत्न पुरस्कार, हास्य जत्रा फेम कलाकार ओंकार भोजने यांना जाहीर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद कुबल या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
श्री दळवी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर त्यांनी ग्राहक हित लक्षात घेऊन बँकेची सेवा अधिक जलद व गतिमान केली आहे. ही शेतकऱ्यांची बँक असल्याने शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध योजना अमलात आणत त्यांना वित्तीय सहकार्य केले. यामुळे येथील शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाला. त्यांचा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ओळखून त्यांच्यासाठी काम केले आहे.
घराच्या आर्थिक सक्षमतेसाठी महिलांना आर्थिक बळ मिळावे यासाठी महिला बचतगटांसाठी त्यांनी विविध योजना राबवून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने काम केले. त्यांच्या सहकार क्षेत्रातील अतुल्य योगदानामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर बँकिंग क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट बँकेचा सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांनी बँकेला मिळवून दिला आहे.
गेली १७ वर्षे ते तालुका विक्री संघ, बाजार समिती, जिल्हा खरेदी विक्री संघ, सावंतवाडी कंझ्यूमर सोसायटी व जिल्हा बँक अध्यक्ष या नात्याने सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांनी घेतलेले क्रांतिकारी निर्णय तसेच त्यांचे या क्षेत्रातील योगदान हे दाखलपत्र असल्यानेच त्यांची 'कोकण रत्न' या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे श्री कुबल यांनी सांगितले. ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात कन्टेन्ट क्रिएटरसाठी 'रील टू रियल पुरस्कार', आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी झिरो टू हिरो पुरस्कर, युवा उद्योजकांसाठी युथ आयकॉन पुरस्कार अशा विविध पुरस्काराचे वितरण होणार असून हा कार्यक्रम रंगतदार होण्यासाठी युवा गायक आपल्या भावगीत गायनाने हि मैफिल सजवणार आहेत.