किल्ले निवतीवर उत्साहात साजरा झाला मराठा आरमार दिन

किल्ले निवतीवर उत्साहात साजरा झाला मराठा आरमार दिन

सावंतवाडी 

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याची आणि मराठा आरमाराच्या गौरवशाली इतिहासाची आठवण जागवण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले निवती येथे मराठा आरमार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन व विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अठरा मावळे सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाली. यावेळी उपस्थित मावळ्यांनी महाराजांच्या कार्याचे स्मरण करत मराठा आरमाराच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन केले. स्वराज्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी उभारलेल्या धाडसी आरमाराचे महत्त्व आणि सागरी किल्ल्यांची ऐतिहासिक भूमिका यांची जाणीव या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली. यावेळी किल्ले निवतीच्या यंदाच्या दुर्गसंवर्धनाचे नियोजनही करण्यात आले. किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक महत्त्व जपून संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, गड-किल्ल्यांविषयी जनजागृती आणि दुर्गसंवर्धनाच्या कार्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढविणे, या उद्देशांवर भर देण्यात आला. कोकण किनारपट्टीवरील किल्ले हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे महत्त्वाचे प्रतीक आहेत. अशा ऐतिहासिक स्थळांवर मराठा आरमार दिन साजरा करून शिवकालीन इतिहासाचे स्मरण करण्याबरोबरच संवर्धन कार्याची आखणी करणे, हा या उपक्रमाचा विशेष पैलू ठरला. दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन व विकास समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जतन करणे, दुर्गसंवर्धनाबत जनजागृती करणे आणि शिवकालीन प्रेरणादायी इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, मराठा आरमाराला अभिवादन आणि किल्ले निवतीच्या संवर्धनाचे काटेकोर नियोजन यामुळे यंदाचा मराठा आरमार दिन ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा संस्मरणीय सोहळा ठरला.