भाजी विक्री करताना युवकाचे हृदयविकाराने निधन

वेंगुर्ला
वेंगुर्ले नगर परिषद बाजारपेठेतील भाजी विक्रेता तथा राऊळवाडा येथील रहिवासी अतुल सुनील केरकर(25) या युवकाचे मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गुरुवारी दुपारी निधन झाले. त्याच्या निधनाने वेंगुर्ल्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून त्याला श्रद्धांजली वाहिली. वेंगुर्ले नगर परिषदेच्या मार्केटमध्ये गुरुवारी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अतुल अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडल्याने त्याला आजूबाजूच्या व्यावसायिकांनी तात्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे दाखल केले. तेथे उपचारादरम्यानच त्याचे निधन झाले. याबाबत संजय आनंद केरकर (४०) यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात खबर दिली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड यांनी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड व हेडकॉन्टेबल भगवान चव्हाण करीत आहेत.