ठाणे महापालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त.
ठाणे
ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. एप्रिल महिन्यात पालिकेच्या सेवेतून ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह, उपनगर अभियंता, आणि सफाई कामगारांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत २०१५ ते डिसेंबर २०२३ पर्यंत १५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यात २०२४ सुरु होताच, पहिल्याच महिन्यात २७ कर्मचारी, अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी २३ जणांची भर पडली आहे. याचाच अर्थ दोन महिन्यात ५० अधिकारी कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याने पालिकेत आणखी पोकळी वाढत जात आहे. त्यानंतर आता एप्रिल महिन्यात तब्बल ३८ अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.
यात शहर विभागातील उपनगर अभियंता नितिन येसुगडे, कळवा हॉस्पीटलमधील डॉ. शैलेश्वर नटराजन (प्राध्यापक), चित्रा लहिरे, रमाकांत बुरपुल्ले (कार्यालयीन अधिक्षक, भरत लोखंडे (मुख्याध्यापक), पाच प्राथमिक शिक्षक, उपमुख्य स्वच्छता निरिक्षक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, वाहन चालक, शिपाई, आया, मुकादम, बिगारी, सुपिरिअर फिल्ड वर्कर आणि १४ सफाई कामगारांचा समावेश आहे.
दरम्यान, महापालिकेच्या प्राथमिक १११ आणि माध्यमिक २३ अशा मिळून १३४ शाळा आहेत. या शाळांमधून सद्यस्थितीत ३५ हजार ४१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळांमध्ये ९०० पदे मंजुर असली तरी देखील प्रत्यक्षात ६७० शिक्षकच उपलब्ध आहेत. त्यामुळे एका एका शिक्षकाला दोन दोन वर्ग शिकविण्याची जबाबदारी खांद्यावर आली आहे. त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे आहे त्या शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा जबाबदारी वाढणार असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांबरोबरच १२ सफाई कामगारांची संख्या देखील वाढल्याचे दिसत आहे. त्यात एप्रिल महिन्यात त्यात आणखी १४ सफाई कामगारांची भर पडली आहे. एकूणच सफाई कामगारांची संख्या देखील या निमित्ताने दिवसेंदिवस कमी होतांना चित्र महापालिकेत दिसत आहे.