वेंगुर्ला येथे मोफत महाआरोग्य शिबिराचा ४०० नागरिकांनी घेतला लाभ

वेंगुर्ला येथे मोफत महाआरोग्य शिबिराचा ४०० नागरिकांनी घेतला लाभ

 

वेंगुर्ला 


    वेंगुर्ला नगरपरिषद, महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती आणि रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत महाआरोग्य शिबीर नाटककार मधुसूदन कालेलेकर सभागृह येथे सुव्यवस्थित नियोजनासह यशस्वीरीत्या पार पडले.या महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ४०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.नागरिकांच्या आरोग्याची सर्वंकष तपासणी व योग्य उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार व मार्गदर्शन केले. शिबिरात डॉ. योगेश नवांगुळ (अस्थिरोग तज्ञ), डॉ. संजय केसरे (जनरल सर्जन), डॉ. प्रशांत कोलते(एमबीबीएस–फिजिशियन), डॉ. समाधान मुळे(स्त्रीरोग तज्ञ), डॉ. विष्णू बाबू (दंत तज्ञ), डॉ. प्रियंका देशभ्रतार(सर्जन व स्तन कर्करोग तज्ञ), डॉ. अभिरामी राजेश (दंत तज्ञ), डॉ. सुनीधी सावंत (रक्त तपासणी), डॉ. गिडीयोन बॉस्को  (नेत्र तज्ञ), डॉ. रक्षा तवरावाल(बालरोग तज्ञ), डॉ. सुयश बाबर(अस्थिरोग तज्ञ), डॉ. निखिल राजेश(फिजिशियन), डॉ. नागेश पवार व डॉ.अनिल नरसिंगकर(समाजसेवा अधिकारी) आदी मान्यवरांनी आपली सेवा दिली.या उपक्रमात वेंगुर्ला येथील होमिओपॅथिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच वेंगुर्ला उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व ओरोस सिव्हिल हॉस्पिटल टीमनेही या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य सेवेसाठी मोलाचे योगदान दिले. या शिबिरामध्ये रक्त तपासणी (हिमोग्लोबिन, कॅल्शियम, थायरॉईड), कॅन्सर तपासणी, ईसीजी (ECG), मधुमेह रुग्णांसाठी साखर तपासणी, दंत व नेत्र तपासणी तसेच इतर सर्वसाधारण आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधेही विनामूल्य देण्यात आली. याशिवाय आयुष्मान भारत व इतर आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन करून नागरिकांना कार्ड काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून वेळेवर निदान व उपचार मिळाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.सदर शिबिरामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध झाली असून भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस वेंगुर्ला नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आला.