सोमवारी नांदगावला महामार्ग रोखणार - राजू शेट्टी
कणकवली
आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सोमवारी २३ मार्च रोजी नांदगाव येथे महामार्ग रोखणार असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज दिला. बागायतदारांना दोन दिवसांत नुकसान भरपाई मिळवून देतो अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली होती. पण आज दहा दिवस उलटले तरीही त्याबाबत निर्णय झालेला नाही. राज्य शासन आंबा, काजू बागायतदारांची घोर फसवणूक करतंय. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन होणारच असा इशारा शेट्टी यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहात शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह संजय नरे, संजय राऊत गणेश वाळके, रामचंद्र लुडबे, रत्नाकर कोळंबकर, चंदू गावडे, सखाराम ठाकूर, चंदन मामघाडी, राहुल लुडबे, विलास लुडबे आदी आंबा, काजू बागायतदार उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, यंदाच्या हवमान बदलामुळे हापूस आंब्याचे केवळ १० टक्के पीक शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आंबा पिकाला हेक्टरी पाच लाख आणि काजू पिकाला तीन लाख रूपये भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे.त्यासाठी यापूर्वी वेंगुर्ले आणि देवगड येथे मेळावे घेतले. तर ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चावेळी आलेल्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसांत आंबा, काजू बागायतदारांना भरपाई मिळवून देतो अशी ग्वाही दिली होती. त्याला आज दहा दिवस झाले तरीही शासनाने निर्णय घेतलेला नाही. येत्या २५ मार्च रोजी अधिवेशन संपुष्टात येणार आहे. तरीही भरपाई देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता आंबा बागायतदारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांवर आमचा विश्वास नाही. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशी ग्वाही दिली होती. पण त्याची कोणतीही पूर्तता झालेली नाही. गेले महिनाभर आंबा, बागायतदार आंदोलने करत आहे. पण एका तरी आंबा, काजू बागायतदाराला बोलावून वस्तुस्थिती जाणून घेण्याची सरकारला आवश्यकता वाटलेली नाही. राज्यातले, कोकणातले आमदारांनी एकाही बागायतीमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केलेली नाही असेही श्री. शेट्टी म्हणाले. येत्या २३ मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले.
konkansamwad 
