'करवीर हायकर्स'च्या सातजणांची एव्हरेस्ट बेस कँप मोहीम यशस्वी......तिरंगा फडकवून, संविधान उद्देशिका प्रदर्शित

'करवीर हायकर्स'च्या सातजणांची एव्हरेस्ट बेस कँप मोहीम यशस्वी......तिरंगा फडकवून, संविधान उद्देशिका प्रदर्शित

रत्नागिरी

 

   कोल्हापूरच्या 'करवीर हायकर्स'च्या सातजणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात आणि खडतर वाटचाल करीत समुद्रसपाटीपासून 5364 मीटर उंचीवरील 'एव्हरेस्ट बेस कँप' मोहीम शनिवारी यशस्वी केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया सातपुते यांचा या मोहिमेत सपत्निक समावेश होता.वयाच्या 21व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि जगातील मृत्यूचा पर्वत अशी ओळख असणारा 'अन्नपूर्णा' पर्वत सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण ठरलेल्या करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.'एव्हरेस्ट बेस कँप'साठी 15 मे रोजी भगवान गौतम बुद्धांच्या जन्मभूमीत, नेपाळ-काठमांडूत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, चिपळूण येथील बी.के. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेजच्या सहप्राध्यापक डॉ. सुप्रिया सातपुते, मुरूम (धाराशिव) चे उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, कोल्हापूरचे उद्योजक विशाल मेहता, समाज माध्यम प्रभावक पती-पत्नी नुपूर आणि अक्षय मठकर दाखल झाले.  काठमांडू ते जगातील सर्वात धोकादायक ओळख असणाऱ्या लुकला विमानतळावरून छोट्या विमानप्रवासानंतर प्रत्यक्षात 'इबीसी'कडे वाटचालीला सुरुवात झाली. लुकला ते फाकडींग ते नामचे बाजार ते तेंगबोचे ते दिंगबोचे ते लोबुचे ते गोरकक्षेप ते एव्हरेस्ट बेस कँप असा हा ट्रेक पूर्ण झाला.शनिवार दि. 23 मे रोजी राष्ट्रीय ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या यशस्वी मोहिमेची सांगता झाली. रात्री उणे 15 अंश सेल्सिअस तर दिवसा 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमान होते. लोबुचे ते 'इबीसी' हा प्रवास अतिशय जीवघेणा ठरला.  प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, हाडे गोठवणारे थंड वारे यामुळे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी लागली. वाटेत येणाऱ्या आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जाऊ शकते, हे या ट्रेकवरून पथकाने अनुभवले. नेपाळमधील 'पीक 15 अॅडव्हेंचर'चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावली.