सावंतवाडी कचरा डेपोतील आगीच्या धुरामुळे चराठा ग्रामस्थ आक्रमक

सावंतवाडी कचरा डेपोतील आगीच्या धुरामुळे चराठा ग्रामस्थ आक्रमक

सावंतवाडी


     नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये लागणाऱ्या आगीमुळे आणि त्यातून निघणाऱ्या धुराच्या लोटामुळे चराठ्यातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून अखेर चराठा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. चराठे गावच्या सरपंच प्रचिती कुबल यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज थेट कचरा डेपोला धडक दिली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि पुढील १० दिवसांत या समस्येवर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.गेल्या काही दिवसांपासून या कचरा डेपोला वारंवार आग लागत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून ही आग विझवण्यात आली असली, तरी गेल्या चार दिवसांपासून परिसरात पसरणारे धुराचे साम्राज्य पाहता, ही आग जाणूनबुजून लावली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सौ. कुबल यांनी शिष्टमंडळासह डेपोची पाहणी केली. यावेळी झालेल्या त्रासाबद्दल आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त केली.याप्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य अॅन्थोनी डिसोजा म्हणाले, “२०२५ मध्ये आम्ही या समस्येविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी कचऱ्याला आग लावली जाणार नाही आणि ग्रामस्थांना त्रास होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गेल्या आठ दिवसांत पुन्हा आग लावण्यात आली असून, येथील कर्मचारीच ही आग लावत असल्याचा आमचा संशय आहे. या धुरामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे."
     सरपंच प्रचिती कुबल यांनी प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत सांगितले की, "येथे अनेक वर्षांपासून कचऱ्याची समस्या आहे. नागरिक घरातून कचरा वर्गीकरण करून देतात, मात्र डेपोमध्ये तो एकत्रच टाकला जातो. गेले ७ दिवस ग्रामस्थ धुरामुळे हैराण आहेत. आज आमच्या संयमाचा अंत झाला म्हणून आम्ही येथे धडक दिली. मुख्याधिकाऱ्यांनी १० दिवसांत यावर कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे, तो त्यांनी पाळावा."
     ग्रामस्थांच्या संतापानंतर आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली. "इथे लागलेली आग विझवण्यात आली होती, मात्र वाऱ्यामुळे ती पुन्हा पेटल्याचे दिसून येत आहे. काही बाहेरील लोकही इथे कचरा टाकत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या कचरा डेपोच्या दोन्ही बाजूंना दरवाजे बसवून परिसर बंदिस्त केला जाईल, तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचेही या समस्येकडे बारीक लक्ष असून, हा कचरा येथून पूर्णपणे उचलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः भेट दिल्याने लवकरच यावर तोडगा निघेल," अशी माहिती आडीवरेकर यांनी दिली.
     या आंदोलनाप्रसंगी चराठा सरपंच प्रचिती कुबल, ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, माजी सदस्य अॅन्थोनी डिसोजा, डुमिंग डिसोजा, परशुराम पाटील, सुरेश गावडे, आकाश गावडे, लतालीन डिसोजा, महेश नाईक, कुणाल गावडे, तसेच नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे आणि आरोग्य निरीक्षक विनोद सावंत आदी उपस्थित होते.