बांद्यात आयोजित 'बर्ड वॉक'मध्ये आढळल्या तब्बल ४० पक्ष्यांच्या प्रजाती
बांदा
जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून 'सह्याद्री ग्रीन फोर्स', बांदा यांच्या वतीने बळवंतनगर परिसरात विशेष पक्षी निरीक्षण फेरीचे (बर्ड वॉक) आयोजन करण्यात आले होते. निसर्गप्रेमी आणि लहान मुलांमध्ये जैवविविधतेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमात एकूण १८ पक्षीमित्रांनी सहभाग घेतला. या फेरफटक्यादरम्यान बांदा परिसरातील विविध अधिवासांमध्ये तब्बल ४० प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, या बर्ड वॉकदरम्यान 'बेसरा' आणि 'स्पेकल्ड पिक्युलेट' हे दोन पक्षी बांदा परिसरात पहिल्यांदाच पाहायला मिळाले. याशिवाय कॉमन कुकू, मलबार इंपिरियल पिजन, ग्रीन वॉर्बलर, लोटर्न सनबर्ड, लिटल स्पायडरहंटर, व्हाइट-चीक्ड बार्बेट, इंडियन कुकूश्राइक आणि इंडियन स्किमिटर बॅबलर यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांचे निरीक्षण उपस्थितांना करता आले. यावेळी प्रा. धिरेंद्र होळीकर यांनी जिल्ह्यातील पक्षी निरीक्षण चळवळीच्या विस्तारावर मार्गदर्शन केले, तर प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी जिल्हास्तरावर संवर्धनाचा मोठा उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मानद वन्यजीव रक्षक भाग्यश्री परब यांच्यासह संजय नांदोसकर, निषाद नांदोसकर, अतुल बोंद्रे, गार्गी बोंद्रे, ओम बोंद्रे, प्रा. धिरेंद्र होळीकर, प्रा. डॉ. गणेश मर्गज, रोहित परब, प्रवीण सातोसकर, अधिराज आंबेरकर, सचिन प्रभू, सिद्धेश मुळये, संयोग प्रभू, नाना सावंत, श्लोक सावंत आणि भालचंद्र जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रवीण सातोसकर यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.
konkansamwad 
