भाजपाच्या माध्यमातून परुळेबाजार सरपंच प्रणीती आंबडपालकर व उपसरपंच संजय दुधवडकर यांचा सन्मान
परुळे
परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणीती आंबडपालकर व उपसरपंच संजय दुधवडकर यांचा भाजपा च्या वतीने विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्यामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला.नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जल महोत्सव कार्यक्रमात परुळेबाजार ग्रामपंचायतीची निवड होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. महाराष्ट्रातील हजारो ग्रामपंचायतींपैकी मोजक्या ग्रामपंचायतींची निवड झाली असून त्यामध्ये परुळेबाजारचा समावेश होणे ही वेंगुर्ले तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.या पार्श्वभूमीवर आयोजित सन्मान सोहळ्यात जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरपंच प्रणीती आंबडपालकर व उपसरपंच संजय दुधवडकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई म्हणाले की, “परुळेबाजार ग्रामपंचायतीने जल व्यवस्थापन, पाणी संवर्धन, पाणी गुणवत्ता तपासणी आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. या कार्यामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळाली असून इतर ग्रामपंचायतींनीही हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.” तसेच त्यांनी महिला नेतृत्वाच्या प्रभावी भूमिकेचेही कौतुक केले.साईप्रसाद नाईक यांनीही आपल्या मनोगतातून सरपंच आंबडपालकर यांच्या कार्याचे अभिनंदन करत, “ग्रामपातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याचे उत्तम उदाहरण परुळेबाजार ग्रामपंचायतीने घालून दिले आहे,” असे सांगितले.परुळेबाजार ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, तसेच महिलांना फील्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रोत्साहन देणे असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.या कार्यक्रमाला माजी सभापती निलेश सामंत, माजी सरपंच प्रदिप प्रभु, ग्रा.पं.सदस्य प्राजक्ता प्रसाद पाटकर, ग्रा.पं.सदस्य सीमा बाबुराव सावंत, ग्रा.पं.सदस्य सुनाद जयवंत राऊळ, ग्रा.पं.सदस्य नमिता भद्रायु परुळेकर, ग्रा.पं.सदस्य शंकर जगंन्नाथ राठीवडेकर, कृष्णा मेस्त्री व स्थानिक कार्यकर्ते, अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण असून उपस्थितांनी ग्रामपंचायतीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

konkansamwad 
