दुर्मिळ होत चाललेल्या फुरसे जातीच्या सापाला तुळस मध्ये जीवदान.
वेंगुर्ला.
भारतात आढळणाऱ्या मुख्य चार विषारी सापापैकी एक फुरसे (Indian saw scaled viper ) या जातीचा साप जो काही वर्षांपूर्वी सर्रास दृष्टीत पडत असे पण आता या जातीचे साप दुर्मिळ होत चालले आहेत.सर्पमित्र महेश राऊळ यांना बऱ्याच वर्षांनी आज हा साप तुळस श्री शिवाजी हायस्कूल येथे आढळून आला.श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक संदीप तुळसकर यांनी त्यांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले. शनिवार असल्यामुळे शाळा सकाळची होती मुलांचा खेळण्याचा तास चालू असताना शाळेच्या आवारात मुलांना छोटासा साप दिसला, त्यांनी आपल्या शिक्षकांना तो साप दाखवला.सर्पमित्र महेश राऊळ हे तुळस मधीलच असल्यामुळे तुळस गावांमध्ये सर्प जनजागृती बऱ्याच प्रमाणात झाली असल्यामुळे मुलांनी आणि त्या शिक्षकांनी त्या सापाला न मारता त्वरित महेश राऊळ यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. राऊळ तिथे गेल्यावर लक्षात आलं की हा फुरसे या जातीचा विषारी साप आहे तो आजकाल दृष्टीस सुद्धा पडत नाही त्या सापाला रेस्क्यू करून सुरक्षित रित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या सापांच्या विषापासून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रकारची औषधे आणि साप चावल्यानंतर दिले जाणारे इंजेक्शन म्हणजे अँटीवेनम (प्रतीसर्पविश) तयार केली जातात. हे साप दुर्मिळ होत चालले आहेत, त्यामुळे अशा दुर्मिळ होत चाललेल्या सापांना वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
फुरसे एक लहानसर साप आहे. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी स्पष्ट पांढरी खूण असते. याचे विषदंत काहीसे लांब असतात. पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिकट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. शेपूट लहान असते.डोक्यावरचे खवले बारीक असून पाठीवरच्या खवल्यांवर दाते असतात.हे साप संधिप्रकाशात किंवा रात्री सक्रिय असतात. तरीही ते दिवसासुद्धा दिसतात एरवी दिवसा ते प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा, कपारी, सडलेले लाकडाचे ओंडके अशा अनेक ठिकाणी लपून बसतात.फुरसे हा साप आक्रमक असतो. त्याला किंचित जरी डिवचले , तर ते इंग्रजी आठच्या आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकींवर एकसारख्या घासतो. त्यामुळे दाते असलेले खरखरीत खवले एकमेकांवर घासले जाऊन खस् खस् असा आवाज एकसारखा होतो. हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो ते पुष्कळदा कळतसुद्धा नाही.
हा साप बेडूक, सरडे, पाली, लहान साप, विंचू आणि अनेक प्रकारचे किडे खातो. हा साप अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. सापांचे मिलन हिवाळ्यात होते व मादी साप एप्रिल ते ऑगस्टदरम्यान पिल्लांना जन्म देतात. मादी एका वेळी ३ ते १५ पिल्लांना जन्म देते.या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो.
हा साप लहान असला, तरी याचे विष नागाच्या विषाच्या पाचपट आणि घोणसाच्या विषाच्या सोळापट जहाल असते. फुरसे लहान असल्यामुळे दंशाच्या वेळी थोडे विष अंगात शिरते, यामुळे बऱ्याच वेळा माणसे याच्या विषाने दगावत नाहीत.याशिवाय आता विष प्रतिरोधक औषधे उपलब्ध असल्यामुळे मृत्यूचा दर कमालीचा घटला आहे.त्यामुळे असे जर साप कुठे आढळून आले तर त्यांना न मारता जवळच्या सर्पमित्रांना बोलवून त्याचं रक्षण करा.