दोडामार्ग येथे नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू....उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वेदांतवर काळाचा घाला  

दोडामार्ग येथे नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू....उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वेदांतवर काळाचा घाला  

दोडामार्ग


      कुडासे-वानोशी नदी परिसरात अंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी गावी आलेल्या या चिमुरड्यावर काळाने घाला घातल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.         
       वेदांत हा मूळचा मुंबईचा रहिवासी होता. सध्या तो आपल्या आजीसोबत दोडामार्ग येथे राहत होता. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे तो गावी आला होता आणि सुट्टीचा आनंद घेत होता. दरम्यान आपल्या भावासोबत वेदांत कुडासे-वानोशी नदीवर अंघोळीसाठी गेला होता. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण दुर्दैवाने ते अपयशी ठरले.या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली आणि युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर वेदांतला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. या अनपेक्षित आणि भीषण अपघातामुळे सांगेलकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नदी, ओढे आणि धरण परिसरात अंघोळीसाठी जाणाऱ्या मुलांची संख्या वाढते, त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी स्वतः अधिक काळजी घेण्याची आणि सतर्क राहण्याची तीव्र गरज आता व्यक्त केली जात आहे.