कळसुलकर शाळेतील तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

कळसुलकर शाळेतील तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग


सावंतवाडी 


   सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या १२५ वर्षपूर्ती निमित्ताने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत पालकांसाठी तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली.या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक तथा नगरसेवक(चंदगड)सुभाष गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे, श्रीमती गावडे, समिती सदस्य श्रीमती दिव्या परब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, परीक्षक अनिल आचरेकर तसेच श्रीमती चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.प्रमुख पाहुणे सुभाष गावडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कळसुलकर शाळा ही दर्जेदार शिक्षण देणारी संस्था असून आज ती १२५ वर्षांचा गौरवशाली टप्पा गाठत आहे. या शाळेचे अनेक विद्यार्थी उज्वल यश संपादन करून समाजात स्थिरस्थावर झाले आहेत. केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित न राहता पालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीही शाळा सातत्याने कार्यरत असल्याचे या उपक्रमातून दिसून येते. भविष्यात या शाळेची अधिक उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.स्पर्धेमध्ये पालकांनी विविध ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वेशभूषा साकारत आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी दोन्ही परीक्षकांनी स्पर्धेतील सादरीकरणातील चांगल्या बाबी तसेच काही राहिलेल्या त्रुटींचा समतोलपणे उहापोह करत स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
सर्व विजेत्यांना नगरसेवक सुभाष गावडे यांच्याकडून पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली. त्यासाठीची आर्थिक देणगी त्यांनी शाळेला दिली त्याबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार मानले.


स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे 
प्रथम क्रमांक: श्रीम.सुचिता वारंग
द्वितीय क्रमांक:श्रीम.संजीवनी विचारे
तृतीय क्रमांक:श्रीम.श्रीमती पूजा अरवारी
उत्तेजनार्थ: श्रीमती रुचिका कदम


     प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रुपये १००१, चषक व पुष्पगुच्छ, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ७०१, चषक व पुष्पगुच्छ, तृतीय क्रमांकासाठी रुपये ५०१, चषक व पुष्पगुच्छ तर उत्तेजनार्थ विजेत्यास रुपये २०१, चषक व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत उपस्थित होते. यावेळी त्यांनी “सावित्रीबाई दत्तक पालक योजना” अंतर्गत शाळेतील पाच मुलींना दत्तक घेतले तसेच शाळेला रुपये १५,००० ची कायमस्वरूपी देणगी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. जी. वरक व श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रदीप सावंत सर यांच्यासह शिक्षक श्री धोंडी वरक, अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर, वैष्णवी लोके यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमास पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.