कर्ली नदीकाठी बेकायदेशीर वाळू रॅम्पवर प्रशासनाचा हातोडा
कुडाळ
मुंबई उच्च न्यायालयाने वाळू गटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली असतानाही कर्ली नदीतून बोटींद्वारे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. या अवैध वाहतुकीसाठी नदीकाठी उभारण्यात आलेले अनधिकृत रॅम्प महसूल प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तहसीलच्या पथकाने ही मोठी कारवाई केली. 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी उशिरा तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या पथकात निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मयेकर, नेरकर, सागरे, इंदप, कनवडे तसेच संबंधित पोलिस पाटील यांचा समावेश होता. पथकाने कर्ली नदी किनाऱ्यावरील विविध ठिकाणी रॅम्प मालकांनी तयार केलेले अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबी लावून जमीनदोस्त केले. सध्या कर्ली नदीमधील वाळू गटांच्या लिलावाला न्यायालयाची स्थगिती असल्याने वाळू उपशावर पूर्ण बंदी आहे. मात्र तरीही काही रॅम्प मालकांनी नदीकिनारी बेकायदा रॅम्प उभारून बोटींद्वारे वाळू काढणे सुरूच ठेवले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत थेट कारवाई केली. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर उपशाला आळा बसणार आहे.
konkansamwad 
