दाभोली इंग्लिश स्कूलची वैदेही नांदोस्कर NMMS शिष्यवृत्तीस पात्र

दाभोली इंग्लिश स्कूलची वैदेही नांदोस्कर NMMS शिष्यवृत्तीस पात्र

वेंगुर्ला


      वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीच्या दाभोली इंग्लिश स्कूल, दाभोली येथील विद्यार्थिनी कु. वैदेही भिवा नांदोस्कर हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.वैदेहीच्या या यशाबद्दल दाभोली हायस्कूलमध्ये विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी व वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर दाभोलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.श्री. दाभोलकर यांच्या हस्ते वैदेहीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी वैदेही, तिचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यशाबद्दल शुभेच्छा देताना श्री. दाभोलकर यांनी शाळेस एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून दिला.या प्रसंगी वैदेहीची आई सौ. भक्ती भिवा नांदोस्कर, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. आत्माराम प्रभुखानोलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संजय आरोलकर, मुख्याध्यापक श्री. किशोर शांताराम सोन्सूरकर, शिक्षिका सौ. रेश्मा चोडणकर, शिक्षक श्री. वसंत पवार, श्री. नितीन घोगले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान श्री. दाभोलकर यांनी शाळेच्या वतीने सुरू असलेल्या AI प्रशिक्षण उपक्रमाची माहिती घेतली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या या आधुनिक उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले."अलीकडच्या वर्षांत माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावणाऱ्या दाभोली इंग्लिश स्कूलच्या भावी वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा," असे गौरवोद्गार श्री. दाभोलकर यांनी यावेळी काढले.NMMS सारख्या महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून वैदेहीने शाळेचे व गावाचे नाव उंचावले आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.