सावंतवाडी माजगाव येथे झाडाला आग 

सावंतवाडी माजगाव येथे झाडाला आग 

 

सावंतवाडी


      सावंतवाडी तालुक्यातील माजगाव वरचीआळी परिसरात भर वस्तीत असलेल्या एका फणसाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्यामुळे आग विझवण्यात यश आले आणि मोठा धोका टळला.माजगाव वरची आळी परिसरात जमिनीवर साठलेल्या पाला-पाचोळ्याला अचानक आग लागली होती. उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरली आणि जवळच असलेल्या फणसाच्या मोठ्या झाडाने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे संपूर्ण झाड जळून खाक झाले. ही घटना वस्तीच्या मध्यभागी घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाचे कर्मचारी नंदू गावकर, वैभव घाटकर आणि विनोद काष्टे हे बंब घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग आजूबाजूच्या घरांपर्यंत पसरण्यापूर्वीच विझवली.अग्निशमन दलाच्या या तत्परतेबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे पाला-पाचोळा पेटताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.