सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आंदोलन कशाला? वैभव नाईक यांचा सवाल

सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आंदोलन कशाला? वैभव नाईक यांचा सवाल

कुडाळ


    पालकमंत्री नितेश राणे यांनी टोलबाबत घेतलेल्या भूमिकेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केले आहे. "सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावे?" असा सवाल करत पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा वैभव नाईक यांनी कुडाळ येथे व्यक्त केली. ओसरगाव येथील टोलनाक्यावरून टोल वसुली प्रस्तावित आहे. त्यातही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील राजकीय वक्तव्याने देखील रंगली आहेत. माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये, तसेच सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमाफी द्यावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता.दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासीयांसाठी टोलमाफी केली जाईल अशी घोषणा केली आहे. त्याबाबत माजी आमदार नाईक यांना विचारले असता, त्यांनी पालकमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले आहे. "गेली काही वर्षे या महामार्गाचे काम सुरू आहे. अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर टोलवसुली करू नये अशी आमची मागणी आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आणि ही अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी," अशी अपेक्षा माजी आमदार नाईक यांनी व्यक्त केली.यावेळी ठाकरेसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक उपस्थित होते.